होम  »  ब्लॉग स्पेस

ब्लॉग स्पेस

मनसे आणि दुखरं मराठी मन
Oct 25, 2008
मनसे आणि दुखरं मराठी मन
Posted by ज्ञानदा | {77} कॉमेन्ट्स

माझा मित्र कायम मला चिडवतो की, तुमच्या मुंबईला एका हिंस्र नेत्याची कायम गरज असते. बाळ ठाकरे झाले आता त्यांची जागा त्यांचा पुतण्या घेतोय. पुस्तकांच्या जशा सुधारून वाढवलेल्या आवृत्या असतात तशी राज ठाकरे ही बाळ ठाकरे यांची सुधारून बिघडवलेली आवृत्ती आहे. दुख-या मराठी मुंबईकरांना राज ठाकरे नावाचा नवा हिंस्र नेता आता लाभलाय. तो किती काळ पावेल ते आता बघायचं.
अनेक सुुबुद्ध मराठी माणसांनी , ' राजची मेथड नाही पण मॅडनेस ' कुठं तरी पटतोय, असं सांगितलंय. मुंबईत मराठी मुलांना नोक-या मिळत नाहीत, त्यांना डावललं जातंय, भय्यांची अरेरावी चाललीए, मुंबईचं कॅरेक्टर मराठी नाही, इंग्रजी नाही तर युपी - बिहारचं बनत चाललंय, भोजपुरी हिरो इथं फेमस होतायत, आमच्या मराठी पोरीही हिंदी बॉलिवुडमध्ये जाऊन युपी बिहारवाल्यांची गाणी गातायत. भय्यांना धडा शिकवण्याची गरज सुबुद्ध मराठी मध्यमवर्गीय लेखकांनीही मान्य केलीए पण राजची दणका मेथड मात्र बरोबर नाही हे त्यांनी सांगितलं.
राजच्या भल्या भल्या टीकाकारांनाही मुबईत मराठी भाषिकांना डावललं जातंय हा मुद्दा पटलेला आहे. मराठी मुलांपुढे आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. मराठी मुलांना अपेक्षेप्रमाणे नोक-या मिळत नाहीएत. मनसेनं या मूळ दुख-या भावनेचं राजकारण केलंय. मुंबईतला मराठी टक्का घसरतोय हे सत्य आहे. खरंतर हा टक्का 1960मध्ये वाढण्याचं कारण होतं गिरणी कामगार. जे राज ठाकरे, आज ज्या मराठी माणसाचं तथाकथित नेतृत्व करायला पुढे येतायत त्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करायला, त्याची सशक्त गिरणी कामगार संघटना मोडून काढायला पहिली सुरु वात बाळ ठाकरे यांनीच केली होती. कृष्णा देसाई खून आणि त्यानंतरचं शिवसेनेचं राजकारण हे मराठी माणसांची युनियन कमकुवत करण्याचं राजकारण होतं. मानभावी काँग्रेसनं आणि शिवसेनेनं ते खेळलेलं आहे.
एक लक्षात घेऊ या, मुंबईतला कोळी आग-यांचा वर्ग सोडल्यास प्रत्येक मुंबईकर उपरा आहे. 1960 पर्यंत इथला श्रमिक मुंबईकर मराठी होता. या श्रमिक मराठी मुंबईकराला, वैश्य मुंबईकरानं कायम डावलंलं होतं. आज मुंबईतल्या ' कॉस्मॉपॉलिटन कॅरेक्टर ' बद्दल अहमहमिकेने बोलणारे अनेकजण हा मुद्दा विसरतात. सुकेतू मेहताच्या ' मॅॅक्झिमम सिटी ' मध्ये मुंबईतला मराठी म्हणजे ' घाटी ' याचं सविस्तर वर्णन आहे. कामवाली बाई, घरगडी रामा हाच मराठी वर्ग मारवाडी गुजराती घरात अभिप्रेत होताए या विषयी सुकेतू मेहतानं लिहिलंय. मराठी माणसाच्या मुंबईतल्या न्यूनगंडाची बीजं या वर्गीय तफावतीत आहेत.
मुंबई हे भारतातलं पहिलं वैश्य शहर. या वैश्य शहरात सर्व दलित कामं साठच्या दशकापर्यंत मराठी माणसानं केली. कम्युनिस्ट ट्रेड युनियननी गिरणी कामगाराला न्याय दिला तरी महाराष्ट्राच्या इतर भागातून पोटापाण्यासाठी मुंबईत येणारा, झोपडपट्टीत राहणारा, दलित, दलितेतर मराठी वर्ग कायम उपेक्षित होता.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणूनच एकिकडे मराठी समाजवादी मध्यमवर्गाचा आणि दुसरीकडे संघटित कामगारांचा लढा दिसतो. उरलेल्या नेतृत्वहीन मराठी जनतेला 1969 मध्ये बाळ ठाकरे मिळाले. शहारातल्या लुंपेन, गुजराथी मारवाड्यांनी नाडवलेल्या मराठी जनतेला ' बाळसाहेबांची 'आक्रमकता भावली.
शिवसेना आणि त्यांचं जातीय हिंस्र राजकारण समजून घेताना हा स्थानिक विरुद्ध उपरे हा वाद किती कॉम्प्लेक्स आहे, हे समजून घ्यायला हवं. 60 नंतर मुंबई महाराष्ट्राची झाली. नावापुरती. पण या शहराची सूत्रं ज्या धनिक वर्गाच्या हातात होती तो धनिक वर्ग ' घाटी ' जनतेला तुच्छच लेखत होता. मराठी न्यूनगंडाची , नाकारलेपणाची विषवल्ली 1960 नंतर अधिक जोमानं फोफावली.
आता आपण 2007 मधलं वातावरण बघतोय. मनमोहननं 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाची दारं उघडलीएत, ट्रेड युनियन नेस्तनाबुत झाल्यायत, एकेकाळचे गुंड सन्माननीय राजकारणी बनलेत. राजकारण गुंडांच्या ताब्यात आहे हे स्पष्ट आहे. एकदा foundational crime करून हे गुंड आता मान्यवर झाले आहेत. आपापले मतदारसंघ टिकावणा-या देशमुख - पाटील राजकारण्यांना मुंबईची पर्वा नाहीए आणि मुंबई पालिकेवर डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ आता थकलाय. तो आता पूर्वीसारखा मराठी माणसाच्या रक्षणाला पुरा पडेल असं दिसत नाहीए.
दरम्यान मुंबई नावाच्या मॅग्नेटनं बिहार युपीतल्या दुष्काळग्रस्त, भुकेकंगाल कामगाराला मुंबईच्या दिशेनं ढकललंय. विकासातल्या असमतोलामुळं त्याला दुसरा पर्यायच ठेवलेला नाहीए. मुंबईतला जुना मराठी कामगार वर्ग आता मध्यमवर्ग झालाय. नव्या मराठी स्थलांतरितांना आता युपी बिहारवाल्यांशी झुुंजावं लागतंय. आणि फाडफाड इंग्रजी बोलणारा मलबार हिल क्लास , त्याच्या खिसगणतीत मराठी माणूसच नाहीए. इंग्लिश मीडियम मधल्या मराठी कॉन्व्हेंट कन्व्हर्टला त्यानं मॅनेज केलंय पण नवा लुंपेन मराठी , छे! तो त्यांना नकोय.
जागतिकीकरणानं जगभर आपले ऑक्टोपसी हातपाय पसरलेत. यातनं नाकारल्या गेलेल्यांची संख्या मोठी आहे. मंुबईत असंघटित युपी बिहारी कामगार, मराठी कामगार, तमिळ, तेलगु कामगार सारेच भरडले जातायत. त्यातल्या मराठी कामगारांना आपल्याच भाषेच्या जोरावर संघटित होता येतंय. त्यांचा म्होरक्या झालाय राज ठाकरे !
दुदैर्वाची गोष्ट अशी या असंघटित, नाडलेल्या, सर्व्हिससेक्टरमध्ये खस्ताखाणा-या उदाहरणार्थ बारा तास तुमच्या गाडीवर राहणा-या ड्रायव्हरपासून ते 100 कपडे दर दिवसाआड इस्त्री करून आणणा-या धोब्यापर्यंत कुणाचीही खरी पर्वा राजला नाही. त्याच्या डोक्यात फक्त राजकारण आहे. त्याला न्यूनगंडाचं ठसठसणारं गळू नीट दिसलंय.
तुम्हीही नीट डोळे रोखून राजकडे बघा. मराठी गिरणीकामगाारांना देशोधडीला लावून काबीज केलेली कोहिनूर मिल त्याच्याकडे आहे. या ठाकरे कुटुंबियांकडे एवढा पैसा कुठून आला ? हे पण आम्ही आता विचारू शकत नाही.
शिवाय ' चलेजाव 'ची घोषणा राज ठाकरेंच्या सवयीची आहे. रमेश किणींनाही त्यांनी तेच सांगितलं होतं. बिचारे किणी त्यांना आठवायला आता कोणाला वेळ आहे? शिवसेनेतल्या धनुष्यातला हा ब्रोकन अ‍ॅरो आता मराठी माणसाचं कल्याण करणार आहे की स्वत:ची राजकीय प्रतिमा उंचावणार आहे ते काळच ठरवेल. एवढं खरं की आता मराठी माणसाचा धीर सुटलाय. हिंसेचं वावडं त्याला वाटत नाहीए. त्याला राज ठाकरेचं वावडंही वाटत नाहीए.
एकेकाळी खोमोनीवर विश्वास ठेवणा-यांनाही तसं वाटत नव्हतं. पण हिंसेचा आधार घेणारा कोणताच समाज जगात टिकू शकत नाही. त्याला नाकारण्याकडंच सर्वांचा कल राहतो. आर्थिक गणिताचं भान नसलेला राज ठाकरेसारखा नेता मराठी माणसासाठी फार काही करू शकणार नाहीए.
प्रश्न आहे पैशांच्या भाषेचा. त्याला मराठीचा, देवनागरीचा बनवून आपण सुरेख गंडवले जातोय. हेच चाळीस वर्षांपूर्वी नव्हतं का झालं? हिस्ट्री रिपीट्स अ‍ॅण्ड हिस्टॉरिकल मिस्टेक्स रिपीट विथ अ‍ॅब्सोल्युट सर्टनटी!
मुंबईतला हा नवा टायगर आहे की मॅन-इटर ते काळच ठरवेल.
ज्ञानदा

प्रतिक्रिया

Posted by ABHI

मी या लेखाशी शंभर टक्के सहमत आहे.  २०-२५  वयातल्या मराठी मुलांना "राज"कारणाची अजुन पूर्णपणे अक्कल आलेली नसते. तरी वाईट वाटून घेऊ नये आपलीच मूल आहेत.

Posted by pravin rangnathrao shivangikar

नमस्कार ज्ञानदाजी, तुमचे लिखाण आणि एकंदरीत पत्रकारिता ही उत्तमच आहे. आणि मी तुमचे जवळपास सर्वच कार्यक्रम आवडीने पाहतो. हा ब्लॉग वाचल्यानंतर मी थोडा संभ्रमित झालो आहे, कारणही साहजिकच आहे, तुम्ही सर्व पत्रकार मंडळी तुमचे विचार मांडताना ज्याप्रकरे बोलता,लिहिता त्यापेक्षा किततरी आधिक पटीने मुलाखत घेताना सामंजास्याची भूमिका घेतलेली दिसते, उदा: तुम्ही राज ठाकरे यांची मनसे च्या ४त्या वर्धापान दिना निमीत्य घेतलेली मुलाखत. त्यावेळी तुम्हास त्यांची भूंमिका पटते का?

Posted by hopeless(sadly) citizen

Aplyala mahit ahe ki apan kiti hi danga kela tari he sagle rajkarni ek ahet koni hi konavar karvai karnar nahi so apan budhiwadi lok kayam nuste prashna vicharnar mazha ek prashna wagle sarana ahe aplya vahini var halla zhala apan nishedh mhanun ek diwas betha satyagrah kelat pan nantar kay?????? mala hi rag alla hota tenva ki assa halla yogya nahi pan mazhya mate saglya press ni ektra yeun nidan mahinabhar tari jo koni ya pudhe assa halla karel tyache vartankan karyche nahi asse tharavave

1
. 2 . 3 . 4 . 5 . 6 . 7 . 8 . 9 . 10 . next

आजचे कार्यक्रम

आजचा सर्व्हे

महिला विधेयकाला होणारा विरोध योग्य आहे का?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]